अवैध वाळू उत्खनन प्रकरणी ठेकेदारावर १४ लाखाचा दंड

वळद येथे विनापरवाना वाळूची साठवणूक
विदर्भ वतन / गोंदिया: परवानगीपेक्षा अधिक क्षमतेत वाळूचा उपसा करुन त्याची वाहतूक वहन केल्याप्रकरणी देवरी तालुक्यातील ठेकेदार अनिल बिसेन यांच्यावर आमगाव येथील तहसीलदारांनी १४ लाख १, ३०० रुपयाचा दंड ठोठावला. महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ च्या कलम ४८(७)अंतर्गत १०३८ ब्रास गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी ३० दिवसाच्या आत ही दंडाची रक्कम शासनाकडे जमा करण्यास सांगण्यात आले. दंडाची रक्कम मुदतीच्या आत न भरल्यास अनिल बिसेन हे कारवाईस पात्र राहतील असे आपल्या आदेशात तहसिलदार डी. एस. भोयर यांनी म्हटले आहे.
बिसेन यांनी लिलावात खरेदी केलेला वाळू साठा १०० बॉ्रस एवढाच होता मात्र, चौकशी केली असता १०३८ बॉ्रसचे उत्खनन केले असल्याचे सामोर आले. ज्यांच्या शेतामध्ये हा वाळूसाठा आहे, त्या शेतकर्यांना १९ मे रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
याबाबत ठेकेदार अनिल बिसेन म्हणाले कि, आपण आमगाव तालुक्यातील वळद येथे आपल्या शेतात फळझाडे लावण्याकरीता सरपंच किशोर रहांगडाले यांच्या नर्सरीत गेलो असता त्यांनी आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रात जप्त करण्यात आलेला वाळूसाठ्याचा लिलाव असल्याचे सांगीतले. आपणास वाळू खरेदी करावयाची असेल तर १३ मे रोजी दुपारी लिलावाकरीता अधिकची बोली लावून विकत घ्यावी लागेल असे सांगीतले. त्यामुळे मी ५ हजार रुपयाची अनामत रक्कम भरुन लिलावात सहभागी झालो. माझ्या व्यतिरिक्त या लिलावात इतर ३ लोकांनी सहभाग घेतला होता. आपली बोलीची रक्कम सर्वाधिक असल्याने लिलाव मला मिळाला.  लिलावाची रक्कम १ लाख ४६ हजार ३६० रुपये चालानच्या माध्यमातून बँकेत जमा करुन वाहतुक परवाना घेतला. वाहतुक साठ्याच्या परवान्याप्रमाणेच १५ ते २२ मे पर्यंत दोन ट्रक्टर व एका टिप्परद्वारे वाहतुक करावयाचे होते. त्यानुसारच आपण वाळूची वाहतुक करीत होतो. इतर कुठल्याही वाळूचा उपसा न करता लिलावातून मिळालेल्या वाळूचीच आपण वाहतुक करीत आलेलो आहो. मात्र, मिळालेल्या तक्रारीच्या आधारावर वळद येथील मौका चौकशी करण्यात आली असता सदर जागेतून १०३८ ब्रास वाळूचे अवैध उत्खनन करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने बिसेन यांच्यावह १४ लाखाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!