विविध देशातून आलेल्या सर्व १४ प्रवाशांना आमदार निवासातील विलगीकरण

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

नागपूर :- विविध देशातून दोहामार्गे नागपुरात आलेल्या सर्व १४ प्रवाशांना आमदार निवासातील विलगीकरण छावणीत ठेवण्यात आले आहे. दरम्यान कतार एअरवेजच्या दोहा नागपूर विमानाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आणखी २० प्रवासी नागपुरात दाखल होणार आहेत.

परदेशातून करोना विषाणू बाधित प्रवासी नागपुरात येऊ नये म्हणून २२ मार्चपासून सर्व परदेशी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मात्र, तोपर्यंत येणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला संसर्ग असू शकतो म्हणून त्यांना आमदार निवासात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण छावणीत १४ दिवस ठेवण्यात येणार आहे.

कतार एअरवेजच्या (क्यूआर५९०) दोहा- नागपूर विमानाने गुरुवारी रात्री  हे १४ प्रवासी नागपूर विमानतळावर आले. त्या प्रवाशांच्या उजव्या हातावर शिक्का लावून त्यांना आमदार निवासातील विलगीकरण छावणी नेण्यात आले. एअर अरेबियाचे (जी९४१६) शारजहाँ- नागपूर विमान रद्द करण्यात आले आहे. कालही हे विमान रद्द करण्यात आले होते, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ संचालक एम.ए. आबीद रुही यांनी दिली. दरम्यान, ६ई-७७४ एअर इंडियाचे दिल्ली-नागपूर विमान शुक्रवारी नागपुरात आले नाहीत. तसेच गोएअरचे जी८-२८३ पुणे- नागपूर विमान, जी८-१४२ मुंबई-नागपूर विमान, जी८-२५१९ दिल्ली- नागपूर विमान रद्द करण्यात आले. तरा इंडिगोचे ६ई-६६३ कोलकाता- नागपूर विमान पावणे दोन तास विलंबाने रात्री उशिरा येणार होते. शुक्रवारी कतार एअरवेजचे नागपूरहून दोहाला जाणारे क्यूआर५९१ नागपूर-दोहा विमान रद्द करण्यात आले. शिवाय गोएअरचे जी८-१४१ नागपूर-मंबई, जी८-२६०२ नागपूर मुंबई हे विमान रद्द करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!