तरुणांना उद्योग, व्यवसायाकडे वळणे आवश्यक

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर

नागपूर : स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरीवर अवलंबून चालणार नाही तर तरुणांना उद्योग, व्यवसायाकडे वळणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजातील तरुणांना प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचा संकल्प अखिल खेडुला कुणबी समाज संघटनेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.

‘समाजमत’ व्यासपीठावर अखिल खेडुला समाज संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर पिल्लारे, सचिव सुधाकर भर्रे, सहसचिव नंदकिशोर अलोणे, कोषाध्यक्ष संजय बुल्ले, कार्यकारिणी सदऱ्य मनोहर कुथे, मोरेश्वर दोनाडकर, विजय तोडरे, दयाराम सहारे, अरुण डोणारकर उपस्थित होते.

खेडय़ात राहून शेती करणारा समाज म्हणजे ‘खेडुला कुणबी’. विदर्भात सुमारे १० ते १५ लाख लोकसंख्या या समाजाची आहे. पूर्व विदर्भात भंडारा, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या भागात समाजाची ६० टक्के लोकसंख्या आहे. विविध प्रमुख राजकीय पक्षात या समाजाचे नेते सक्रिय आहेत. समाजाला एकत्रित करून त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी १९५८ ला तुळशीराम झुर्रे यांनी अखिल खेडुला कुणबी समाज संघटनेची स्थापना केली.

१९९४ पासून या संघटनेच्या कामाने वेग घेतला. वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून समाजबांधवांना एकत्र आणणे आणि त्यांचे प्रबोधन करणे हा या संघटनेचा मुख्य हेतू. म्हाळगीनगर चौकात समाजाचे मोठे समाजभवन आहे. तेथे विविध कार्यक्रम घेतले जातात.

समाज प्रगत, शिक्षित आहे. मुला-मुलींच्या शिक्षणाचे प्रमाणही लक्षणीय आहे. मात्र ज्या प्रमाणात उच्चशिक्षित मुलांचे प्रमाण समाजात आहे, त्या प्रमाणात नोक ऱ्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे नैराश्याचे वातावरण आहे. त्यामुळे केवळ सरकारच्या आधारावर अवलंबून न राहता समाज संघटनेच्या माध्यमातून युवकांना व्यवसाय आणि उद्योगाकडे वळवता येईल का, याबाबत विचार करण्यात आला आणि त्यासाठी व्यावसायिक मार्गदर्शन शिबिराचा उपक्रम हाती घेण्यात आला, त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी जागेची गरज आहे. सरकारकडे याबाबत मागणी करण्यात आली. मात्र निवडणुका जाहीर झाल्याने ही प्रक्रिया थांबली. पुढच्या काळात याचा पाठपुरावा केला जाईल. याबाबत विधानसभाध्यक्ष नाना पटोले आणि दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांना निवेदन देण्यात आले आहे, असे प्रभाकर पिल्लारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. समाजातही मोठे उद्योजक आहेत, त्यांना एकत्र आणून त्यांची या उपक्रमासाठी मदत घेण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  समाज मोठय़ा प्रमाणात ग्रामीण भागात राहतो. तेथून उच्चशिक्षणासाठी मुले शहरात येतात. त्यांना राहण्यासाठी वसतिगृह उभारणीचा प्रयत्न आहे, असे सुधाकर भुर्रे यांनी सांगितले. समाजातील पारंपरिक रुढी, परंपरा दूर करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. विवाह समारंभात होणारा अनाठायी खर्च कमी व्हावा यासाठी प्रबोधन केले जात आहे.

सल्लागार मंडळाच्या माध्यमातून कौटुंबिक वाद समापोचाराने मिटवले जात आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना उद्योगाकडे वळवले जात आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!