महापौर चषक क्रीडा स्पर्धा रंगणार १४ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान…

            विदर्भ वतन न्युज पोर्टल, चंद्रपूर

चंद्रपूर – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दि. १४ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान महापौर चषक कुस्ती, शरीरसौष्ठव व कबड्डी स्पर्धा २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. गांधी चौक येथील महानगरपालिका पटांगण येथे कुस्ती व शरीरसौष्ठव स्पर्धा तर विठ्ठल मंदिर व्यायाम शाळा पटांगण येथे कबड्डी स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन १५ फेब्रूवारी सायंकाळी ६ वाजता गांधी चौक येथे होणार आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे चंद्रपूर शहरातील खेळाडूंसाठी मान्यताप्राप्त संघटनांमार्फत विविध क्रीडा प्रकारांमध्ये महापौर चषक स्पर्धा आयोजित केल्या जातो. शहरातील विविध खेळाडूंना आपल्या क्रीडाकौशल्य गुणांना वाव देता यावा तसेच खेळांविषयी आवड असलेल्या तरुण मुला-मुलींनी शहराचे नाव राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवावे हा त्यामागील उद्देश आहे. या स्पर्धांमध्ये विजेत्या खेळाडूंना व संघांना पैशांच्या स्वरुपात धनादेशाव्दारे बक्षिसे देण्यात येतात. यामुळे खेळाडूंना आर्थिक मदत होते.

या स्पर्धेत राज्यभरातून विविध वजनगटातील पुरूष व महिला कबड्डी – कुस्ती संघातील खेळाडू सहभागी होणार आहेत. मॅटवर घेण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात विजेत्या व उपविजेत्या मल्लांना अनुक्रमे  ७१,०००/- व ४१,०००/- रोख पारितोषिक व चषक तसेच महिला गटात विजेता व उपविजेत्या मल्लांना अनुक्रमे रुपये ५१,०००/- व ३१,०००/- रोख पारितोषिक व गदा देऊन गौरविण्यात येणार आहे.    विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा २२ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असून यात ५५ किलो ते ८० किलो व त्याहून अधिक वजनगटाचा समावेश असून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, बेस्ट पोझर व बेस्ट इम्प्रू बॉडी बिल्डर व ट्रॉफी या स्वरूपाची बक्षिसे दिली जाणार आहेत.

तर कबड्डी स्पर्धेत पुरुष विजेता व उपविजेत्या संघाला अनुक्रमे ८१,०००/- व ६१,०००/- रोख पारितोषिक व चषक तसेच महिला गटात विजेता व उपविजेत्या संघाला अनुक्रमे ५१,०००/- व ३१,०००/- रोख पारितोषिक व चषक  देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय मॅन ऑफ द टूर्नामेंट रुपये २१,०००/-, वूमन ऑफ द टूर्नामेंट रुपये ११,०००  याशिवाय मॅन ऑफ द मॅच, अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू , आवडता खेळाडू उत्कृष्ट पकड उत्कृष्ट चढाई  या स्वरूपाची वैयक्तीक रोख बक्षिसेही दिली जाणार आहेत.  कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दि. १६ फेब्रुवारी तर कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दि. १ मार्च रोजी पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!