आधी जमिनीचा मोबदला हवा, पैठण येथे शेतकरी आक्रमक

               विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर

वृत्तसंस्था – मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या कामाला इसारवाडीत आज पोलिस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. मात्र, आधी जमिनीचा माेबदला द्या अन्यथा आम्हाला गाेळ्या घाला, अशी भूमिका २८ शेतकऱ्यांनी घेतल्याने पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन रखडलेले काम बंदाेबस्तात सुरू केले.

पैठण तालुक्यातील ५५ गावांहून अधिक गावातील पिण्याचा व जवळपास १४ हजार हेक्टर वरील पिकांचा पाणी प्रश्न अवलंबून असणारी २२२ कोटींची ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडत गेली. यात योजनेचा खर्च वाढत गेला. यात काही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात आला. तर, काही शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला रखडल्याने ते ३२ शेतकरी न्यायालयात लढा देत आहेत. यात योजना रखडत गेली असल्याने आज शंभरहून अधिक पोलिस बंदोबस्तात व उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, डीवायएसपी गोरख भामरे, पाटबंधारेचे अनिल निंभोरेंसह पोलिसांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी ११ वाजता ईसारवाडी या ठिकाणी कामाला प्रारंभ करण्यात आला. मात्र, याला येथे असलेल्या शेतकऱ्यांनी अगोदर १० वर्षांपासून थकीत असलेले भूभाडे द्या म्हणत अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. २८च्या जवळपास शेतकऱ्यांचा आक्रमकपणा पाहून प्रशासनाने काम सुरू न करता शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवल्याने १३ शेतकऱ्यांना ताब्यात घेत काम सुरू केले.

पोलिस प्रशासनाने दुपारी १ वाजता आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्र-२ चे काम सुरू करण्यात आले असून येत्या ८ दिवसांत हे पूर्ण होऊन जाईल असल्याचे कार्यकारी अभियंता अनिल निंबोरे यांनी सांगितले.

कार्यकारी अभियंत्यांवर रोष दहा वर्षांपासून योजना रखडली असून कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे हे शेतकऱ्यांविरोधी असून काही बड्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला दिला. परंतु, आम्ही काही देऊ शकत नाही म्हणून आमच्या जमिनीचे पैसे दिले नाही असा आरोप शेतकऱ्यांनी करत या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करत अनिल निंबोरे यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनस्थळी काही काळ तणाव निर्माण झाला.

रोजगार व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सतत ही योजना मार्गी लागली पाहिजे यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे आता योजनेच्या कामाला गती आली असली तरी योजना पूर्णत्वाकडे जाण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्यामुळे ही योजना रखडत गेली. यात राजकारण वाढत गेले. याला जिम्मेदार कार्यकारी अभियंता निंभोरे यांना शेतकरी मानत आले असल्याने आज त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली.

२८ शेतकऱ्यांचे जमिनीचे भूभाडे व मोबदला देणे बाकी असून हे प्रकरण कोर्टात आहे. आज या ठिकाणी जवळपास २५ ते ३० शेतकरी आंदोलनासाठी उतरले. मात्र, यासाठी जवळपास शंभरहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. यातील १३ शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

C

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!